सेलू, :-वसंत आवटे
सेलू ,नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयोजित केलेल्या पहिल्या प्रशिक्षण सत्रात ३५० पैकी तब्बल २० कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती दाखवल्याने प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक कामकाज ही अत्यंत संवेदनशील व शिस्तबद्ध प्रक्रिया असल्याने या निष्काळजीपणाकडे प्रशासनाने गंभीरतेने पाहिले असून, गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रशिक्षण सत्रास निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसेले, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, बीडीओ उदय जाधव, तसेच बीईओ गजानन वाघमारे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी उमेदवार, मतदान केंद्रांची रचना, मतदान दिवशीचे नियोजन आणि संपूर्ण प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मतदान केंद्रांवर कार्यरत अधिकारी, केंद्राध्यक्ष आणि तिसरे मतदान अधिकारी यांच्या जबाबदाऱ्यांवर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. फॉर्म १७ सी, मतदान दिनदर्शिकेतील नोंदींची अचूकता, मतदार यादीतील तपासणी, केंद्रावरील शिस्त आणि प्रक्रिया सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदान प्रक्रियेत होणारी लहानशी चूकही निकालांवर परिणाम करू शकते, यावर विशेष लक्ष वेधण्यात आले.
यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ‘बॅलेट युनिट’, कंट्रोल युनिट आणि इतर तांत्रिक उपकरणांचा वापर कसा करावा, तांत्रिक अडचणींतून सुटका कशी करावी तसेच आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले. प्रत्येक अधिकाऱ्याने मतदान यंत्रणांचा पूर्ण अभ्यास करूनच पुढील प्रशिक्षणास उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.प्रशिक्षणास अपेक्षित उपस्थिती नसल्याने गैरहजर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाने कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या असून, अनुपस्थितीमागचे कारण लिखित स्वरूपात मागविण्यात आले आहे. पुढील प्रशिक्षण सत्रात कोणतीही ढिलाई न करता सर्व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, स्पष्ट आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकपणा, पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, आगामी नगरपरिषद निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे.