गटविकास अधिकारी निष्क्रिय असल्यामुळे ग्रामसेवकांना रान मोकळे झाले
तालुका प्रतिनिधी :-धनराज पवार
-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील बहुतांश गावांमध्ये ग्रामसेवक सातत्याने गैरहजर राहू लागल्याने गावांच्या विकासकामांना मोठी खिळ बसली आहे. गावात येण्याऐवजी तालुक्यात बसून कागदोपत्री काम उरकण्याची ग्रामसेवकांची सवय वाढत चालली असून त्यामुळे ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प झालं आहे. नागरिकांच्या प्रमाणपत्रांपासून शासकीय योजनांपर्यंत सर्व कामे महिनोंमहिने प्रलंबित राहत आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांचा स्पष्ट आरोप आहे की गटविकास अधिकाऱ्यांच्या ‘आर्थिक संरक्षणा’मुळेच ग्रामसेवकांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये नोंदवही अद्ययावत नाही, विकासकामे सुरू होत नाहीत, निधी उपलब्ध असतानाही प्रक्रिया थांबलेली आहे आणि ग्रामस्थांना छोट्या कामांसाठी देखील तालुक्यात चकरा माराव्या लागत आहेत.
ग्रामसेवकांची मनमानी ही संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची देणगी आहे,” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सामान्य नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. या उदासीनतेमुळे ग्रामीण विकास पूर्णपणे ठप्प झाल्याचे स्पष्ट होत आहे.यामुळे ग्रामस्थांनी एकमुखी मागणी केली आहे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीवर कठोर कारवाई करण्यात यावी. गावाचा कारभार कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष उपस्थितीत चालला पाहिजे, ग्रामीण विकास पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जनतेची ठाम भूमिका आहे.