हिवाळी अधिवेशनात ‘पाच’ कलमी कार्यक्रमाचा धडाका
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाने आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यांतील जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी तळेगाव रुग्णालयाकरिता १५५.८३ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर करून घेतला. आरोग्यसेवेसोबतच त्यांनी ‘जनसुरक्षा’ या विषयाला प्राधान्य देत कारंजा येथील १९२ कोटींच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ड्रग्जसाठी लागणाऱ्या विदेशी केमिकलवर बंदी घालण्याचे आणि कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे मतदारसंघातील तरुण पिढी सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांचा मुद्दा वानखेडे यांनी अत्यंत गांभीर्याने मांडला. तालुक्यातील ४३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असताना केवळ १० शिक्षकांची नियुक्ती झाली असून ३३ जागा अजूनही रिक्त आहेत, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. “शहरालगत राहण्याच्या शिक्षकांच्या प्रवृत्तीमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,” असे सांगत त्यांनी या असमतोल दुर करण्याची मागणी केली. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने दखल घेत, ग्रामीण भागावर अन्याय झाला असल्यास निश्चितपणे कारवाई करून शिक्षक भरतीत समतोल राखला जाईल, अशी ग्वाही दिली.
शेतकरी कल्याणासाठी आमदार वानखेडे यांनी अधिवेशनात मोठा विजय मिळवला. आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यातील ८,९९९ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी १२.३८ कोटी रुपयांचा नुकसानभरपाई निधी मंजूर करून घेतला. अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत ‘संजीवनी’ ठरली आहे. सोबतच, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पानंद रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी महसूल मंत्र्यांकडून स्वतंत्र ‘नवीन लेखाशीर्ष’ (Budget Head) मंजूर करून घेतले. आता या योजनेचे अध्यक्ष स्थानिक आमदार असल्याने तिन्ही तालुक्यातील शेतशिवारांतील रस्त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी आणि जलदगतीने सुटणार आहेत.
मतदारसंघातील गरीब आणि गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरासाठी वानखेडे यांनी सरकारला धारेवर धरले. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२५ मध्ये शासनाकडून २.५० कोटींचा निधी उपलब्ध असूनही आर्वी, आष्टी आणि कारंजा मधील ६०८ लाभार्थ्यांना अद्याप पहिला हप्ता मिळाला नसल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली. प्रशासकीय दिरंगाईमुळे गोरगरिबांची घरे रखडल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रस्ताव प्राप्त होताच एकाही दिवसाचा विलंब न लावता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश दिले.
अशा प्रकारे, आमदार सुमित वानखेडे यांनी अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी नवा मुद्दा उपस्थित करून आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ यशस्वीपणे राबवला आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, घरकुल आणि सुरक्षा या पाचही महत्त्वाच्या स्तंभांवर त्यांनी मिळवलेले यश त्यांच्या कृतिशील नेतृत्वाची साक्ष देत आहे. मतदारसंघातील सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वच स्तरातून त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे स्वागत होत असून, खऱ्या अर्थाने त्यांनी विधानसभेत आर्वी मतदारसंघाचा ‘पॉवर शो’ करून दाखवला आहे.