तालुक्यात कृषी विभागाची धडाकेबाज कारवाई; विना परवाना कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या केंद्रावर धाड, ₹६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Rahul
2 Min Read

सेलू – प्रशांत झाडे

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे (ता. सेलू) येथे मोठी कारवाई करत विना परवाना व मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खते विक्री करणाऱ्या केंद्रावर धाड टाकली. या कारवाईत ६ लाख ५५ हजार १०९ रुपये किंमतीचा अवैध कीटकनाशक व खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ता. २२ शनिवारला कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली. रात्री ११.३० पर्यंत कारवाई सुरू होती.
पदम बेताला (वय ६५ वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक १४, सिंदी रेल्वे) यांच्या निवासस्थानी करण्यात आली.

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार ते अनधिकृतरीत्या विना परवाना तसेच मुदतबाह्य कीटकनाशके आणि खते विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. यावरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सखोल झडती घेऊन माल जप्त केला.

शेतकऱ्यांची फसवणूक व बेकायदेशीर विक्रीप्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३, रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक अधिनियम १९६८, आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईची फिर्यादी म्हणून सौ. जोत्सना व्यंकटेश घरत, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक, सेलू यांनी तक्रार नोंदविली.

कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भरारी पथकात शिवा जाधव (कृषी विकास अधिकारी, जि. प. वर्धा), प्रमोद पेटकर (जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वर्धा), संदीप पवार (विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक, नागपूर), तसेच पोलीस ठाणेदार नरेंद्र निस्वादे (पो. स्टे. सिंदी रेल्वे), पो. उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, लिपिक हर्षल सडमाके, सहाय्यक कृषी अधिकारी नितीन आव्हाळे, दिपक जाधव, वैभव निंबाळकर, पोलीस हवालदार चंद्रकांत भावरे, आणि पोलीस अंमलदार मंगेश मुडे यांनी सहभाग घेतला.

भरारी पथकाच्या या कारवाईमुळे वर्धा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषी विभागाने दाखवलेली तत्परता प्रशंसनीय मानली जात आहे

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *