समृद्धीकडे नेणारे अभियान थंड; ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढू लागली
आरती कारंजेकर
देवळी(प्रतिनिधी)महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत गावात होणारे वाद गावातच मिटवून शांततेकडून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी गावागावांत समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, या समित्यांकडून आता प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी, गावात किरकोळ कारणांवरून भांडणे आणि गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे.
समित्या प्रभावी नसल्यामुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. जुने वाद उकरून काढणे, मारामारी करणे आणि तक्रारी थेट पोलिस ठाण्यांत दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अभियानाला पुनरुज्जीवित करून तंटामुक्त समित्या सक्रिय करणे, ही काळाची गरज बनली आहे.
*बहुतांश ठिकाणी कागदोपत्री अस्तित्व*
शासनाने मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या त्या अभियानातील समित्या आता बहुतांश ठिकाणी केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत.
निवड झालेल्या सदस्यांची नियमित बैठक होत नाही, तसेच वादांमध्ये सक्रिय मध्यस्थी होताना दिसत नाही.
*गावातील राजकारण झाले टोकदार*
तंटामुक्तीच्या माध्यमातून होणारी सामूहिक बांधणी थांबल्याने
गावातील जुन्या वादांना आणि राजकारणाला टोकदार स्वरूप प्राप्त झाले आहे. वाद मिटवण्याऐवजी, त्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल, याकडेच जास्त लक्ष दिले जात आहे.
*तंटामुक्त समितीचे*
*काम काय ?*
या समित्यांचा उद्देश हा गावात
उद्भवणारे वाद-विवाद, वैयक्तिक
आणि जमिनीचे तंटे, तसेच सामाजिक
संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत न जाता
गावातच चर्चेने व सामोपचाराने सोडवणे
हा होता. ग्रामस्थांना न्याय मिळवून देणे हे प्रमुख काम होते.
*गावचे वाद गावात मिटावेत*
गावकरी ते रावकरी काय करी असे म्हंटले आहे. म्हणजे कोणतीही बाब जर गावाने मनावर घेतली तर ती तडीस जाते गावातील तंटे, वाद गावातच मिटले पाहिजेत यासाठी अलीकडे गावात प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे गावातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत जावुन गावातील दोन्ही गटाचे आर्थिक नुकसान होत आहे.
एकेकाळी राज्यात या अभियानामुळे गावे शांत झाली होती आणि तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कार मिळत होते.
समित्या निष्क्रिय झाल्याने आता पुरस्कार मिळण्याचे प्रमाणही पूर्णपणे थंडावले आहे.