सातारा,/अस्लम सुतार:
धर्म–जात–राजकीय भेद विसरून मानवतेची सेवा करणारी आदर्शवत घटना बोऱगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मयत अभिषेख एकनाथ खेडेकर रा.देवदरी (ता. शिराळा) मुळा रा. जवळखेड ता. पार्थटी . येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या एकमेव नातेवाईक असलेल्या पत्नीची मानसिक व कौटुंबिक स्थिती अत्यंत खराब असल्याने अंत्यविधीस कोणीही पुढे येत नव्हते.परिस्थितीची गंभीरता ओळखून बोऱगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी तातडीने सामाजिक संस्थांना संपर्क केला. त्यानंतर खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्था, सातारा तसेच मदरसा नागठाणे यांनी पुढाकार घेत एक अनोखी मानवी सेवा उभी केली.खिदमत-ए-खल्क संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल सुतार, आरिफ खान, असिफ फरास तसेच मदरसा नागठाणेचे ट्रस्टी व जनता अॅम्ब्युलन्सचे अब्दुल (पिंटू शेठ) सुतार, मुफ्ती अहमद भगवान आणि मदरशातील विद्यार्थी यांनी पोलिस उपनिरीक्षक एस. डी. भोसले, महिला हवालदार एम. एस. निंबाळकर, शिपाई एस. एन. जाधव यांच्या उपस्थितीत मृत व्यक्तीचे सर्व धार्मिक व मानवी विधी पूर्ण आदराने पार पाडले.या संपूर्ण प्रक्रियेत स्वयंसेवक कोणत्याही धर्माचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर मानवतेचे दूत म्हणून उभे राहिले.मदरसा विद्यार्थ्यांनी दाखवलेली कृती “मदरसे फक्त धार्मिक शिक्षण देत नाहीत, तर माणुसकीचीही शिकवण देतात” याचे जिवंत उदाहरण ठरली. अनेकदा सोशल मीडियावर मदरशांविषयी निर्माण होणाऱ्या गैरसमजांना या घटनेने सुंदर उत्तर मिळाले.नातेवाईक नसलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करणे ही अत्यंत संवेदनशील व धाडसी जबाबदारी असते. तरीही या तरुणांनी मृत व्यक्तीस पूर्ण सन्मानाने अंतिम मान देत खऱ्या मानवतेचे दर्शन घडवले.ही घटना पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्थांमधील सद्भावनेचे उत्तम उदाहरण ठरली असून, “कायद्यापेक्षा आणि धर्मापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी” हा प्रभावी संदेश समाजासमोर पोहोचवण्यात यशस्वी ठरली आहे.सदर कार्यात सहभागी सर्व तरुण व संस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून, सातार्यातील हा प्रसंग मानवतेचा दीप पुन्हा एकदा उजळवणारा ठरला आहे.