वसंत आवटे,सेलू प्रतिनिधी :
सेलू नगरपरिषद निवडणुकीची तापती हवा दिवसेंदिवस वाढत असून उमेदवारी निश्चितीच्या पार्श्वभूमीवर गटबाजी, तडजोडी आणि दबावकारक हालचालींना मोठेच जोर आले आहेत. अनेक दिग्गज नेते स्वतःचा राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी अंतर्गत जुळवाजुळवीचे डावपेच रचत असून यामुळे तिकीट वाटपात पक्षांतर्गत नाराजीला उफाळा आला आहे.
नगरपालिकेतील वेगवेगळ्या प्रभागांत नेत्यांचे स्वतःचे समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही अपेक्षित उमेदवारांना संधी न मिळाल्याने त्यांनी तत्काळ स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय स्वीकारल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण होणार आहे.
प्रभागांतील सामाजिक-जातीय गणित, स्थानिक वर्चस्व आणि गटांचे हितसंबंध या तिपेडीमुळे प्रत्येक पक्षावर उमेदवार अंतिम करताना प्रचंड दबाव आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या नाराजीने स्वरूप घेतले असून, काही ठिकाणी मात्र नेत्यांमधील तडजोडीमुळे अनपेक्षित उलथापालथ होत असल्याचे दिसते.मतदारसंघात राजकीय मित्र-शत्रूंच्या समीकरणातही मोठा बदल झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिग्गजांनी आपला सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी प्रतिस्पर्धी गटांशीही संपर्क ठेवला असल्याचे बोलले जात आहे.सध्या तरी राजकीय वातावरण ढवळले गेले असून नावांची अनिश्चितता व तडजोडींनी निवडणूक रंगतदार बनवली आहे. अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यावर या गोंधळात कोणाचा प्रभाव टिकतो आणि कोणाची गणिते कोसळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.