ता.प्र.अमोल झाडे
समुद्रपूर:- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असून, या योजनांचा मुख्य उद्देश कमी भांडवलात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे, उत्पादन व प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन उद्योजक घडवणे हा असल्याचे सहायक निदेशक मधुकर भुरले यांनी सांगितले.
स्थानिक विद्या विकास महाविद्यालयात आयोजित एम. एस. एम. ई. – विकास कार्यालय नागपूर च्यावतीने उद्यमिता जागरूकता कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. किशोरचंद रेवतकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वासराव धनविजय, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक समुद्रपूर तसेच पि. टी. डोईफोडे, माजी सहायक निदेशक,युवा उद्योजक स्वप्निल निमजे, संचालक – शक्ती इलेक्ट्रिकल इंडस्ट्री, हिंगणघाट , समन्वयक प्रा.अजय मोहोड उपस्थिती होते
पुढे बोलताना मधुकर भुरले यांनी एमएसएमई योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, एमएसएमई नोंदणी असलेल्या उद्योगांना सरकारी अनुदान, व्याजदरातील सवलत, तंत्रज्ञान उन्नती, बाजारपेठ उपलब्धता, प्रशिक्षण सुविधा, तसेच विविध वित्तीय सहाय्य मिळते.,
मोठ्या उद्योगांच्या तुलनेत कमी भांडवलात उद्योग सुरू करणे शक्य असल्याने युवकांनी सरकारी प्रशिक्षण घेतल्यावर स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे विश्वासराव धनविजय यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध कर्ज योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुद्रा कर्ज योजना, तसेच उद्योजकांना मिळणारी आर्थिक मदत, कर्ज प्रकरण याबाबत मार्गदर्शन केले.तर माजी सहायक निदेशक पी. टी. डोईफोडे यांनी उद्योग सुरू करताना नियोजन, बाजारपेठेचे विश्लेषण, भांडवल व्यवस्थापन आणि उद्योग विस्तार याबाबत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.
युवा उद्योजक स्वप्निल निमजे, संचालक – शक्ती इलेक्ट्रिकल इंडस्ट्री, हिंगणघाट यांनी स्वतःचा उद्योग उभारण्याचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याबद्दल प्रेरणादायी अनुभव सांगून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राकडे आकर्षित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किशोरचंद रेवतकर यांनी
आजच्या युगात वाढत्या बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली असून शिक्षण घेऊनही योग्य नोकरी मिळत नसल्याने अनेक युवक निराश होतात. मात्र रोजगारासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी उद्योजकतेबाबत उपलब्ध संधींचा उपयोग करून स्वावलंबी बनण्याचे आवाहन प्रास्ताविकातून समन्वयक प्रा. अजय मोहोड यांनी केले
संचालन प्रा.घनशाम कदमधाड यांनी तरसर्वांचे आभार प्रा.मनोज खेकरे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ . सदानंद सार्वे,प्रा.सतीश बेले,प्रा.फारीश अली,प्रा.राजू बाभुलकर,प्रा.फारीश अली,प्रा.महेश चिव्हाणे,प्रा.दिपक वालदे, धनेश रंगारी,सह स्थानिक युवक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.