कारंजा : सनशाईन स्कूल, कारंजा तर्फे संस्थाध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रेम महिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वविकास, मानसिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांशी नाते अधिक दृढ करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
पहिल्या सत्रात डॉ. मोसम फिरके, मनोचिकित्सक तथा संचालक मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर, नागपूर यांनी बाल मानसशास्त्र आणि आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांमध्ये असावेत असे महत्त्वपूर्ण गुण स्पष्ट केले—
काळजी व समजूतदारपणा, स्पष्ट संवादकौशल्य, स्वतःचे व्यवस्थापन, संयम व लवचिकता, न्याय्य वृत्ती तसेच आयुष्यभर शिकत राहणारा शिक्षक होणे यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांची भूमिका समजावताना त्यांनी दिलेला संदेश विशेष लक्षवेधी ठरला —
“अपयश म्हणजे शेवट नसून शिकण्याची संधी.”
विद्यार्थ्यांनी अपयशाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शिक्षकांना दैनंदिन वर्गव्यवस्थापनासाठी त्यांनी दिलेला सल्ला महत्त्वपूर्ण ठरला
“प्रतिक्रिया देण्यापूर्वी २ मिनिटे विचार करा.”
यामुळे संवाद अधिक सकारात्मक होत असून तणाव कमी होतो, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात डॉ. मृणालिनी मुकेश टुले यांनी शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य जागरुकता, ताण व्यवस्थापन, तसेच सुरक्षित व सुदृढ शिक्षक–विद्यार्थी नाते या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. अध्यापनातील तणाव हाताळण्याच्या तंत्रांसह विद्यार्थ्यांशी विश्वासू व सुरक्षित नाते कसे निर्माण करावे याबाबत त्यांनी उपयुक्त टिप्स दिल्या.
कार्यशाळेमुळे शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेचे नवे दृष्टिकोन प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांसोबत संवाद अधिक प्रभावी करण्यास हे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन पवन ठाकरे व ममता दिवाणे यांनी केले. सनशाईन स्कूलतर्फे आयोजित ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली.