हिंगणघाट :-प्रतिनिधी
नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते रणजित कांबळे यांनी येथील अनुभवहीन व्यक्तीच्या हाती काँग्रेस पक्षाची धुरा दिलेली असून वरिष्ठ नेत्यांची अवहेलना करून त्यांना जिल्ह्यातून काँग्रेस संपवीण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे असा घणाघाती आरोप काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा प्रमुख प्रविण उपासे यांनी केला आहे.
श्री प्रविण उपासे यांनी यासंदर्भात सविस्तर पणे दिलेल्या वृत्तानुसार, या निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यासाठी राजेंद्र मूळक यांची तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी यवतमाळचे श्री.संजय वानखेडे यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी राका ( शप ) पक्षा सोबत चर्चा केली असता त्यांनी आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आम्ही श्री मुळक यांच्या परवानगीने उबाठाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता उबाठा व काँग्रेस यांनी प्रत्येकी 20 नगरसेवकपदाच्या जागा तसेच उबाठा गटाला अध्यक्षपद व काँग्रेसला उपाध्यक्ष पद असा समझोता झाला होता. याची माहिती राजेंद्र मुलक यांना दिली. त्यांनी मान्यता दिली. परंतु रणजित कांबळे यांनी ही आघाडी बाजूला सारून नगरसेवकपदासाठी मैत्रीपूर्ण लढती व नगराध्यक्ष पदासाठी तुतारीला पाठींबा अशी विचित्र आघाडी केली. असा आरोप श्री उपासे यांनी केला.
श्री उपासे पुढे आपल्या निवेदनात म्हणतात की, येत्या नप निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षानी एकत्र येवून निवडणूक लढवून भाजपाला सत्ते बाहेर ठेवावे अशी बहुसंख्य आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांची इच्छा असतांना सुद्धा केवळ स्वतःच्या हेकेखोर पणाने त्यांनी आघाडी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. व शेवटपर्यन्त काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना झुलवत ठेवत ना उबाठा ना राका शरद पवार गट यांच्याशी आघाडी होऊ दिली नाही. येथील जुन्या अनुभवी नेत्यांना डावलून आपल्या स्वमर्जीतील एका
अननुभवी युवा नेत्यांच्या हाती सर्व अधिकार दिले. व त्या नेत्याने केवळ 13 जागेवर उमेदवार उभे करून नगराध्यक्ष पदा साठी कोणताही योग्य उमेदवार दिलेला नाही.
या भागात काँग्रेसच्या विचारांचा एक मोठा वर्ग असतानाही येथील अनुभवी नेत्यांना विश्वासात न घेता रणजित कांबळे यांनी हेकेखोर पणा मुळे काँग्रेस संपविण्याचा घाट घालून काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रविण उपासे यांनी केलेला आहे.