समुद्रपूर :
आज (२४ नोव्हेंबर) सांयकाळी सुमारे ६.४५ वाजता हिंगणघाटवरून जामकडे दुधाच्या बॅरेल्स घेऊन जाणाऱ्या टाटा एस वाहनाने जाम चौकात पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की टाटा एसची पुढील कॅबिन जागीच चकनाचूर झाली.
अपघातात टाटा एसचा चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
सुदैवाने, अपघाताच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र टाटा एस वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.