कोराडी :- दिलीप येवले
तायवाडे महाविद्यालय महादुला – कोराडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र तायवाडे कॉलेज आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे या होत्या. त्यांच्या हस्ते सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.
प्राचार्य शरयू तायवाडे यांनी आपल्या वक्तव्यातून यशवंतराव चव्हाणांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला . यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. ते एक प्रभावी राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. महाराष्ट्राच्या विकासावर त्यांचा मोठा प्रभाव होता, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री (१ मे १९६०) हे यशवंतराव चव्हाण झाले.
तसेच त्यांनी १९७९ ते १९८० या काळात भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही काम केले. त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या समान विकासावर लक्ष केंद्रित केले. ते एक कुशल नेते होते आणि त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातही सक्रिय सहभाग होता. अशा या महान व्यक्तीचा मृत्यू २५ नोव्हेंबर १९८४ ला दिल्ली येथे झाला. हा कार्यक्रम तायवाडे महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागप्रमुख तसेच केंद्र समन्वयक डॉ. वकील शेख, स्नेहा श्रीवास्तव, चेतना हरणे, प्रणाली उमक, प्रिया नेवारे हे उपस्थित होते.
तायवाडे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी
Leave a Comment