गडसंवर्धन मोहिमेला पंतप्रधानांची दाद! .खा. नीलेश लंके यांची संसदेत पंतप्रधान मोदींशी भेट
रांजणगाव गणपती
प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खासदार नीलेश लंके यांनी संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असता, शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे साक्षीदार असलेल्या रायगडावरील सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गड-किल्ल्यांचे जतन करण्यासाठी खासदार लंके यांनी सुरू केलेल्या लोकसहभागातून चालणाऱ्या मोहिमेचे विशेष कौतुक केले. गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून स्वराज्याचा जिवंत इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाबाबत जाणीव आणि अभिमान निर्माण होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक वाड्या-वस्त्या आजही पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याकडे खासदार लंके यांनी लक्ष वेधले. या वाड्या-वस्त्यांना तातडीने रस्ते जोडणी देण्याची गरज असून, यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा तसेच शेतीमालाच्या वाहतुकीला मोठा हातभार लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे खासदार लंके यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. सध्या सुरू असलेली कांद्याची निर्यात बंद झाल्यास बाजारात भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कांदा निर्यात सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच नाफेड व एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या थकीत देयकांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगत, ही देयके तातडीने अदा करण्याची मागणीही त्यांनी केली
सुपा औद्योगिक क्षेत्राचा वेगाने होत असलेला विकास लक्षात घेता, सक्षम दळणवळण सुविधा अत्यावश्यक असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले. पुणे–नगर रेल्वेलाईन प्रकल्प, पुणे–नगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे तसेच पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली. या प्रकल्पांमुळे औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. खा. नीलेश लंके यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. विकास, शेतकरी हित आणि सांस्कृतिक वारसा जपणे या तिन्ही बाबी केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.