जि.प.प्राथमिक शाळा,आजदा ;माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
तालुका प्रतिनिधी :-अमोल झाडे
समुद्रपूर :
तालुक्यातील आजदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित सांस्कृतिक महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली, तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.
सांस्कृतिक महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश्वर मांडवकर होते. मुख्याध्यापक कल्पना शिंदे , प्रसन्न मांडवकर , पोलिस पाटील सेविन चाफले , नरेश मांडवकर, नितेश थुल, स्वप्नील मांडवकर, मनोहर गावंडे प्रशांत मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोकनृत्य, समूहगीत, एकांकिका, नाट्यछटा व विनोदी सादरीकरणातून आपली कला सादर केली. चिमुकल्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
माजी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील जुने दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त व संस्कार यांची आठवण काढण्यात आली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी वाटचालीत या शाळेचा मोलाचा वाटा असल्याचे मनोगतातून सांगितले. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल क्षिरसागर, चेतन मांडवकर, गुलाब गावंडे, अविनाश मांडवकर , धीरज मांडवकर, अमन थुल, विजय काटकर, मंगेश मांडवकर, अल्पेश मांडवकर , संकेत मांडवकर वशिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.