आकाशच्या अकाली निधनाने समाजमन हळहळले……

Rahul
2 Min Read

*लहान आर्वी :-*

*प्रतिनिधी/सुनिल साबळे*

 

येथुन नजीकच असलेल्या देलवाडी येथील रहिवासी आणि आर्वी येथील सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक आकाश रावसाहेब कोहळे (वय 32 वर्ष )या युवकाचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आष्टी तालुक्यातील समाजमन ढवळून निघाले.

आकाश कोहळे हे शिक्षणाने इंजिनियर झाल्यानंतर स्वतःच्या परिवारापासून दूर राहून नोकरी करण्यापेक्षा त्यांनी शेती व परिवाराकडे लक्ष देण्यासाठी खासगी बँकेत नोकरीचा पर्याय निवडला. यादरम्यान त्यांनी गावातील युवकांना संघटित करून एक मोठे संघटन गावात आणि तालुक्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक गरजू अनाथ लोकांना मदत करणे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, हा आकाशचा स्थायीभाव झालेला असताना आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवत गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आकाशचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. आकाश च्या मागे दोन भाऊ तीन मोठ्या विवाहित बहिणी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. नोकरी करत असताना गावातील अनेक गोरगरीब अनाथ लोकांसाठी ध्येयवेडा होऊन काम करणारा आकाश अवघ्या 32 व्या वर्षी या जगाचा निरोप घेत निघून गेला. आष्टी तालुक्यातील देलवाडी या गावचा रहिवासी असलेला आकाश आपल्या मनमिळाऊ स्वभावाने व कोणाच्याही दुःखात तातडीने धावून जाणारा म्हणून सर्वत्र परिचित होता. त्याच्या अंतिम यात्रेत संपूर्ण विदर्भातून आलेला त्याचा मित्रपरिवार आणि गावात कोणीही मजूर वर्ग कामाला न जाता त्याच्या अंतिम दर्शनासाठी वाट बघत होते. आकाश गेल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरत असताना कोणाच्याही घरची चूल पेटली नाही. . अंत्यसंस्काराला वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोक सभेत अनेक मान्यवरांनी आकाशच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. आमदार दादारावजी केचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते अनंतराव मोहोड यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. आकाश रावसाहेब कोहळे या युवकाच्या अकाली निधनाने तालुक्यातील मित्र परिवारावर व कुटुंबावर आणि गरजवंतांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *