*पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी दिल्या हॉटेल व्यावसायिकांना सूचना*
सेलू. प्रशांत झाडे
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात अद्यापही घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत नसून शहरात मात्र हॉटेल व्यावसायिक चक्क घरगुती सिलेंडरचा उपयोग करत असल्याची गंभीर बाब येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी हॉटेल वर थेट भेट देत हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडरचा वापर करण्यास सांगितले, तसेच यानंतर घरगुती सिलेंडर हॉटेल मध्ये आढळून आल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा समज देण्यात आला. तश्या आशयाच्या नोटीस पुरवठा विभागा मार्फत एक दोन दिवसात हॉटेल व्यावसायिकांना देण्यात येणार असल्याचे समजते. मागील एक महिन्यापासून तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती सिलेंडरचा सुरळीत पुरवठा होत नसून घरगुती सिलेंडरचे वाटप थेट गोडावरून करण्याचा पराक्रम येथील एजन्सी चालकांनी सुरू केला होता. मात्र पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी चौकशी अंती सूचना देत गोडावून होणारा पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले.
शहरात अनेक लहान मोठे व्यावसायिक असून त्यांच्या कडे असणाऱ्या व्यावसायिक सिलेंडर चा वापर न करता चक्क घरगुती सिलेंडर वापर करताना दिसून येतात कारण त्यामागे आर्थिक चक्राचे गणित आहे हे सर्वश्रुत आहे.परंतु पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी राबविलेल्या सूचना मोहीम मुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*घरगुती गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा काही दिवसांपासून होत नसून , येथील काही हॉटेल व्यावसायिक घरगुती सिलेंडर चा वापर करताना दिसून आले. यावेळी त्यांना व्यावसायिक सिलेंडर वापरण्याचा सूचना देण्यात आल्या. जर सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल*
आचल बांगरे
पुरवठा निरीक्षक अधिकारी सेलू.