सेलू. प्रशांत झाडे
🩸सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात संविधान दिन उत्साहात साजरा!
🩸नवचैतन्य बुद्ध विहार समिती व जयभीम मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्याला वंदन करण्यासाठी, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवचैतन्य बुद्ध विहार समिती व जयभीम मित्रपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात नागरिक, महिला, पुरुष आणि तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल वाघमारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत बांधकाम सभापती किशोर इरपाते, डॉ. सरोजताई भगत, आणि अनिल कांबळे यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक गंभीर आणि प्रेरणादायी अधिष्ठान प्राप्त झाले. ऍडव्होकेट राहुल पाटील यांनी आपल्या व्यक्तव्यात भारतीय संविधानाने देशाला एकसंघ व सुरक्षित ठेवण्याचे अमूल्य कार्य केले आहे, यावर जोर दिला. ते म्हणाले, “काही जातीयतेच्या मानसिक प्रवृत्तीचे लोक देशात जात व धर्माच्या नावावर अराजकता व गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा वेळी संविधानचं आपल्याला एकत्र ठेवत आहे.”अध्यक्ष अमोल वाघमारे, किशोर इरपाते व सोपान टेम्भूर्णे यांनी भारतीय संविधानाचे महत्व सविस्तरपणे विषद केले आणि प्रत्येकाने संविधानाचे मूल्य जपले पाहिजे, असे आवाहन केले. नविनकुमार पाटील यांनी देशात संविधान लागू होण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमी उपस्थित लोकांना समजावून सांगितली. केवळ संविधानामुळेच इथल्या सर्व जातीतील व धर्मातील महिला सुरक्षित आहेत आणि त्यांनी धर्मनिरपेक्षता या शब्दाचा खरा अर्थ भाषणातून स्पष्ट केला.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित आशिष धापुडकर,हनुमंत तेलंग, अरुण साखरकर, नरेश धनविज, सुधाकर बेसेकर, ताराचंद पोपटकर, बंधू जामनकर, शालिक भगत, मधुकर तेलंग,यशवंत तेलंग, गौतम भगत, इमाम शहा, शाहरुख शहा, रोहित नंदेश्वर,तर महिलामध्ये माजी सभापती वैशाली पाटील, शुभांगी तेलंग, माधुरी धनविज, लताताई दारून्डे सह शहरातील महिला व पुरुष, तरुण-तरुणी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, ज्यातून संविधानाबद्दलचा आदर आणि जागरूकता दिसून आली.कार्यक्रमाचे संचालन निखिल नंदेश्वर, प्रस्तावना अनिल कांबळे व विशाल नगराळे यांनी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानले.