निवृत्ती वेतनधारकाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

Rahul
2 Min Read

 

नागपूर, दिलीप येवले : निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती धारकांच्या अडचणीचे निवारण व समाधान करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हास्तरीय निवृत्तीवेतन धारकांच्या बैठकीचे आयोजन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या बैठकीस निवृत्ती वेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी नागपूर पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्याम काळे, वरिष्ठ कोषागार मोनाली भोयर, अप्पर कोषागार अधिकारी (वेतन) सतीश गोसावी, अप्पर कोषागार अधिकारी (संगणक) शुभांगी धुर्वे उपस्थित होत्या. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी निवृत्ती वेतन शाखेचे सहाय्यक लेखा अधिकारी सुशिल जक्कुलवार यांनी जीवन प्रमाण पोर्टलबाबत माहिती दिली. तसेच ऑनलाईन हयातीचे दाखले कशा प्रकारे सादर करायचे याबाबत सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले. प्रकाश भोसले यांनी डीजी लॉकर कशा प्रकारे पाहता येईल व निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीतील उपलब्ध सुविधा याबाबत माहिती दिली.

 

अपर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी निवृत्तीवेतन धारकांच्या शंका व तक्रारीचे निरसन केले. निवृत्ती वेतनधारकांना ऑनलाईन सेवा वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. संगणकावरून पीपीओ तपासणे, उत्पन्नाचा दाखला मिळविणे, निवृत्ती वेतनाची स्थिती पाहणे, मोबाइल क्रमांक किंवा घरचा पत्ता बदलविणे अशा सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध असल्याची माहिती दिली. यावेळी कुटुंब निवृत्ती वेतनासंबंधी विविध शंकांचे निरसन करण्यात आले. निवृत्ती वेतनधारक व त्यांच्या संघटनांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी 80 सेवा निवृत्ती वेतनधारक आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *