काटोल/प्रशांत पवार
सध्याची परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे. जर वाघ, हरण, डुक्कर नीलगाय मोर मेले किंवा मारले तर फॉरेन्सिक तपास होतो. सर्व टीम तपासाला लागते. ड्रग्स किंवा शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजा पेरला तर माहिती मिळताच पोलीस त्या शेतकऱ्याला अटक करतात पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरु आहे. त्यावर सरकारचे काहीच लक्ष्य नाही. सरकारच्या नजरेत शेतकरी हा जंगली जनावरापेक्षाही स्वस्त झाला आहे. ह्या सरकारच्या नजरेत शेतकरी कवडीमोल किमतीचा आहे. शेतकरी आत्महत्येला सरकार सोबतच आपण सगळे शेतकरी पण दोषी आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल कारण शेतीमालाचे भाव अर्ध्यावर आले,वीज बारा तास मिळत नाही, आयात निर्यात धोरण चुकीच आहे, शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायला कोणीच समोर येत नाही पण आपले पोट्टे पानठेल्यावर खर्रा खाऊन राजकीय नेते मंडळी चे गुणगान करण्यात व्यस्त आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या पोरांनी सरकारला प्रश्न विचाराची धमक ठेवली पाहिजे. राजकीय नेते मंडळी कोंब आल्यासारखे प्रत्येक गावात वळवळ करत आहे ते आपली राजकीय पोळी ( ठेकेदारीसाठी) व आपल्या पोरांच्या भविष्यासाठी लढत आहे हे आज आपल्याला जिल्हा परिषद व नगर परिषदेमधून दिसून येत आहे. असे जर नसते तर काल श्री.राजेंद्र जनार्दन कोल्हे वय ४० रा. दावसा ता.नरखेड या शेतकऱ्यांनी फक्त सतत होणाऱ्या पिकांचे नुकसान आणि त्यांच्या गाडीवर असलेल्या दीड लाख रुपया साठी आत्महत्या केली आहे.यावर शासन ,प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांनी कोणती माहिती मागवली का? एकीकडे जिल्हापरिषद साठी 30 लाख फुकायला तयार आहे दुसरी कडे सर्वसामान्य शेतकरी दीड लाखासाठी आत्महत्या करत आहे.शासनाच्या प्रशासनाच्या व राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आमच शेतकऱ्याच मरण ढोरा पेक्षा स्वस्त झालं आहे. अशी भावना बंदे यांनी व्यक्त केली आहे